iBet uBet web content aggregator. Adding the entire web to your favor.
iBet uBet web content aggregator. Adding the entire web to your favor.



Link to original content: https://mr.wikipedia.org/wiki/अश्वघोष
अश्वघोष - विकिपीडिया Jump to content

अश्वघोष

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अश्वघोष हा प्राचीन भारतातील बौद्ध विद्वान व संस्कृत भाषेतील नाटककार, कवी होता. हा कालिदासापूर्वीच्या काळातील अग्रणी भारतीय नाटककार मानला जातो.

जीवन

[संपादन]

अश्वघोषाच्या जीवनकाळाबद्दल मतांतरे आहेत : काहींच्या मते याचा जीवनकाळ इ.स.पू. १५०च्या सुमारास असावा[ संदर्भ हवा ], तर अन्य मतानुसार इ.स.चे १ले शतक असावा[ संदर्भ हवा ]. अश्वघोष जन्माने ब्राह्मणपुत्र, गौरवर्णी, पिंगट केसांचा व रूपवान होता. तो वेदविद्येतसंस्कृत भाषेत पारंगत, संगीतज्ञ, गायक आणि वीणावादकही होता. त्याच्या वडिलांबद्दल माहिती उपलब्ध नाही; मात्र त्याच्या आईचे नाव सुवर्णाक्षी होते[ संदर्भ हवा ].

साहित्यिक कारकीर्द

[संपादन]

सिकंदराच्या भारतावरील स्वारीदरम्यान भारतीय उपखंडात ग्रीकांचा प्रवेश झाला. त्यांच्याबरोबरच त्यांची नाट्यकला भारतात आली. तेव्हा एका नाट्यमंडळीच्या संपर्कात अश्वघोष आला. तो ग्रीकांची नाटके पाहू लागला. अशाच एका ग्रीक नाटकाच्या प्रयोगाचा अश्वघोषावर प्रचंड परिणाम झाला[ संदर्भ हवा ]. त्या नाटकातील प्रभा नावाच्या एका नटीवर अश्वघोषाचे प्रेम बसले. तिने त्याच्या प्रेमाला साथ दिली नाही. ती म्हणाली, की "तू असे काहीतरी कर, की ज्यामुळे तुझे नाव अमर होईल". या प्रेमभंगाचा घाव जिव्हारी बसला. त्यातूनच अश्वघोषाचे पहिले नाटक उर्वशी वियोग' जन्माला आले.

अश्वघोषाने राष्ट्रपाल नावाचे दुसरे नाटक लिहिले. त्यानंतर त्याने बौद्ध भिक्षू होण्याचे ठरवले. तो भिक्षू झाला, तरी त्याचे नाट्यप्रेम कमी झाले नाही. त्याने बुद्धशिष्य सारीपुत्र आणि मोग्गलायन यांच्यावर 'सारीपुत्त प्रकरण' नावाचे एक नऊ अंकी संस्कृत नाटक लिहिले. त्या नाटकात चोर, जुगारी, लफंगे, चेट(म्हणजे गुलाम, दास), विट(म्हणजे राजकुमाराचा विलासी पण धूर्त मित्र), गणिका, वेश्या, दारुबाज आणि विदूषकही आहेत. उत्तरकाळात शूद्रकाने लिहिलेल्या मृच्छ्कटिक नाटकात अशीच पात्रे आढळतात. अश्वघोषाचा प्रभाव कालिदासासारख्या उत्तरकालीन नाटकाकरांवरही झाल्याचे दिसते[ संदर्भ हवा ].

अश्वघोष हा भिक्षू, संगीतज्ञ व गायक असल्याने तो एकतारीवर गाणी गाता गाता बौद्धतत्त्वज्ञानाचा प्रचार वस्त्यावस्त्यांमधून हिंडत आणि चौकात उभे राहून करत असे. अश्वघोष हा बहुधा पुढे विसाव्या शतकात रूढ झालेल्या पथनाट्याचा जनक असावा [ संदर्भ हवा ].

अश्वघोषाने बुद्धचरितम् नावाचे महाकाव्यही लिहिले आहे. सौंदरानंद नावाचे अन्य एक महाकाव्यही त्याने लिहिले.[] त्यातल्या नायिकेचे पात्र गौतमबुद्धाच्या नंद नावाच्या चुलत भावाच्या लावण्यवती पत्नीवर बेतले होते. अश्वघोषाने वज्रसूचि नावाचा एक वैचारिक ग्रंथही लिहिला.

अश्वघोषाच्या 'बुद्धचरित' आणि 'सौंदरानंद' या काव्यांची कथानके डाॅ. संगीता बर्वे यांच्या 'नल-दमयंती आणि इतर कथा' या पुस्तकात आली आहेत.

प्रभाव व आधुनिक वारसा

[संपादन]

१ जानेवारी हा अश्वघोषाचा कल्पित जन्मदिनांक समजून त्या दिवशी बोधी नाट्य परिषद् भारतीय कला दिवस साजरा करते.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ मोहन कान्हेरे. संस्कृत साहित्याची रसपूर्ण ओळख -Maharashtra Times. Maharashtra Times. 24-04-2018 रोजी पाहिले. महाकवी अश्वघोष यांनी 'सौंदरानंद' या काव्याची रचना केली. गौतम बुद्धांचा भाऊ नंद आणि त्याची पत्नी सुंदरी यांच्या जीवनावर आधारित असं हे कथानक आहे. विलासी जीवन जगणाऱ्या नंदाला बुद्धांनी बौद्ध धर्माची दीक्षा दिली. पुढे मग संन्यासी पदापर्यंत नंद कसे पोहोचले ते उत्सुकतेने 'सौंदरानंद' या काव्यात आपण वाचतो. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

बाह्य दुवे

[संपादन]